Skip to content Skip to footer

म्युच्युअल फंडाचा बांबू!

गुंतवणूक करताना बहुतेकांना म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकणे म्हणजे बांबू लावून घेणे असे वाटत असते आणि ते बर्याच अंशी खरेच आहे. फक्त आधी त्यातील चूक-बरोबर नक्की काय हे जाणलं, तर आपल्याला पश्चात्ताप करायची वेळ येत नाही. चला तर, म्युच्युअल फंडाबाबत सर्वसामान्य माणसाच्या होणार्या सात प्रमुख चुका आपण आधी समजून घेऊयात.

पहिली चूक – म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचीच नाही

  • बदलत्या काळाबरोबरच पैसा गुंतवून त्यावर रिटर्न्स मिळविण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वीसारखेच पुन्हा त्याच-त्या `घर-एफ्‌डी-पोस्ट’ मध्ये पैसा अडकून ठेवणे म्हणजे फाईव्ह-जी युगामध्ये पोस्टकार्डावर अवलंबून राहाण्यासारखेच आहे. म्हणूनच या गुंतवणूकीला अजिबात पर्याय नाही.
  • पूर्वी गाडीमध्ये अथवा घरात एसी असणे ही लक्झरी होती ग्लोबल वॉर्मिंगमुळे मात्र आता ती काळाची गरज झालेली आहे. अगदी त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड ही देखील लक्झरी राहिलेली नसून काळाची गरज झालेली आहे.

दुसरी चूक – म्युच्युअल फंडला `दामदुप्पट श्रीमंतीचा एक्स्प्रेस-वे’ समजून चालणे

  • म्युच्युअल फंड म्हणजे `पी हळद अन्‌ हो गोरी…’ अशी `Quick Rich’ स्कीम नव्हे. सिस्टीमॅटिकली गुंतवणूक करून तिचे दीर्घ कालावधीमध्ये अविश्वसनीय समृद्धीत रूपांतर करणारा हा सोपा मार्ग आहे. सुरुवातीला अतिशय संथपणे-शांतपणे-सावध अन्‌ धीम्या गतीने जाणारा वळणा-वळणाचा हा घाटरस्ता आहे. मात्र एकदा तो पार केला, की घाटमाथ्यावरील नेत्रसुखद दृश्य अन्‌ गारव्याची जी प्रचीती येते ती केवळ अवर्णनीय!

तिसरी चूक – एकाच वेळी अनेक फंडांच्या स्कीम्स्‌मध्ये गुंतवणूक

  • बर्याच जणांना एकाच पद्धतीच्या फंडांच्या वेगवेगळ्या स्कीम्स्‌मध्ये पैसे गुंतवण्यामध्ये जास्त सेफ अन्‌ सिक्युअर वाटतं. शिवाय त्यामुळे आपले रिटर्न्स देखील जास्त वेगाने वाढतील असाही त्यांचा गैरसमज असतो. वस्तुत: यांमध्ये डायव्हर्सिफिकेशन अजिबातच होत नसल्यामुळे मानसिक समाधानाव्यतिरिक्त प्रत्यक्षात याचा काहीच अधिक फायदा होत नाही.

चौथी चूक – चुकीच्या अपेक्षा ठेवून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक

  • कित्येकांना पतपेढी, चिटफंड, बिल्डर्सकडील डिपॉझिटस्‌ अशा ठिकाणची गुंतवणूक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त सेफ वाटते. वस्तुस्थिती अगदी विरूद्ध आहे. खरंतर वरील तिन्हीही प्रकारांतील गुंतवणुकीचं `होत्याचं नव्हतं’ होऊ शकतं. (पुण्यातील एकेकाळच्या नामांकित बिल्डरचा अनुभव अगदी ताजा आहे!) मात्र म्युच्युअल फंडामध्ये असं होत नाही. प्रतीक्षेचा कालावधी कमीजास्त होऊ शकतो, मात्र सेबी आणि इतर रेग्युलेटरी बॉडीज्‌च्या काटेकोर देखरेखीखाली सर्व फंडांचा कारभार चालत असल्यामुळे जोखीम मर्यादित प्रमाणांत राहाते.

पाचवी चूक – काहीही उद्दिष्ट न ठेवता केलेली गुंतवणूक

  • प्रत्येकासाठी वैयक्तिक अशी खास उद्दिष्टे असतात अन्‌ बर्याचदा ती बदलती देखील असतात. उदाहरणार्थ, बॅचलर वयात घर, गाडी, इत्यादी; लग्नानंतर दुसरे घर, स्टेटस गॅजेटस्‌, मुलांचे उच्चशिक्षण; मध्यमवयीन लोकांसाठी भविष्यकालीन वैद्यकीय खर्च, घरांतील लग्नकार्य, ट्रॅव्हल-टुरिझम, वगैरे. त्यानुसार आपल्याला योग्य तो म्युच्युअल फंड निवडून नियोजन करता येते. मात्र कोणतेही उद्दिष्ट न ठेवता केलेली गुंतवणूक बर्याचदा आपल्या पदरी निराशाच देऊन जाते.

सहावी चूक – म्युच्युअल फंड म्हणजेच शेअर मार्केट

  • हा समज संपूर्णत: चुकीचा आहे. प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये निव्वळ शेअर्स कधीच असत नाहीत. इक्विटी, डेट, गोल्ड, इत्यादी अनेक अॅसेट क्लासचा त्यामध्ये समावेश असतो. नानाविध गुंतवणुकीच्या रोपांचा हा एक फ्लॉवरपॉट आहे, जो अनेक वर्षे रूजला, वाढला की अचंबित करून टाकणारा सुगंधी अन्‌ बहुढंगी परतावा देतो.

सातवी चूक – दहा रुपये एन्‌एव्ही म्हणजे लॉटरी???

  • म्युच्युअल फंडाची एन्‌एव्ही जितकी कमी तितके जास्त युनिटस्‌ मिळतात म्हणून जास्तीत जास्त युनिटस्‌ मिळणारा फंड चांगला समजून बरेच जण नवीन फंडात पैसे गुंतवतात. विशेषत: नवीन फंड दहा रूपये एन्‌एव्ही या किमतीमध्ये मिळत असल्याने त्यांना उगाचच हायसे वाटत असते. मात्र नवीन फंडाचे एक्स्पेन्सेस्‌, ओव्हरहेडस्‌ आणि अन्सर्टन परफॉर्मिंग एबिलिटी याचा विचार केला तर ज्या फंडाची एन्‌एव्ही जास्त आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड खरं तर काळाच्या ओघात सिद्ध झालेला असतो. तिथे कमीतकमी अनिश्चितता आणि
    शिवाय चांगला परतावा मिळण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
  • एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊयात. कल्पना करा – तुम्ही दोन हजार रुपयांचे आंबे घ्यायला बाजारात गेला आहात. समोर ४ डझनाची देवगड हापूसची पेटी आहे आणि त्याच्या शेजारी ८ डझनाची मद्रास तोतापुरीची पेटी आहे. फायनान्स्‌च्या भाषेत बोलायचं तर एका हापूसची एन्‌एव्ही साडे-एक्केचाळीस रुपये आहे आणि तोतापुरीची एकवीस… तुम्ही कोणती पेटी घरी आणणार?

थोडक्यात, म्युच्युअल फंड खर्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर बांबूच्या रोपाचं उदाहरण विसरता कामा नये.

बांबूचं बेणं (`बियाणं’ या शब्दाचा ग्रामीण अवतार) जमिनीत खोल पेरलं की पहिली तीन वर्षे तिथे काहीही म्हणजे एक गवताची काडी देखील उगवलेली दिसत नाही. मात्र जमिनीच्या पोटात खोलवर त्याची रूजवात व्यवस्थित चालू असते. सुमारे तीन वर्षांनंतर एक छोटासा अंकुर फुटून जमिनीतून कोंभ वर आलेला दिसतो. त्यानंतर मात्र प्रत्येक दिवशी दोन फूट वेगाने बांबू वाढू लागतो. काही प्रजाती तर दररोज चक्क पाच फूट देखील वाढतात.

मात्र त्यासाठी पहिली काही वर्षे त्या बेण्याची निगा अन्‌ स्वत:वर संयम राखण्याची नितांत गरज असते.

हाच पॅटर्न आपण म्युच्युअल फंडाबाबत वापरायला हवा. सुजाण इन्व्हेस्टर स्वत:च्या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंडाचा बांबू लावून घ्यायला कधीही विसरत नाही कारण दीर्घकालीन समृद्धीचा हाच एक सोपा राजमार्ग आहे.

आगे मर्जी आप की.. आखिर पैसा जो है आप का!

Leave a comment

0.0/5

Subscribe to the updates!

[mc4wp_form id="461" element_id="style-1"]

Subscribe to the updates!

[mc4wp_form id="461" element_id="style-11"]